सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याची मतदार यादी अचूक, निर्दोष होण्यासाठी सजगतेने प्रभावी काम करावे, तसेच युवा नवमतदारांची अधिकाधिक प्रमाणात नोंदणी होण्याच्या दृष्टीने मोहीम आखावी, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज येथे दिले.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, विभागीय कार्यालय, पुणेच्या उपायुक्त (पुरवठा) समीक्षा चंद्राकार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत-शिंदे, सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.
मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्दी पर्यंत चालणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मतदानासाठी पात्र लोकसंख्येची जास्तीत जास्त अचूक नोंद होण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे सूचित करून विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील दुबार व मयत, नावे, पत्ता व छायाचित्रे समान असलेली नावे कमी करण्याची प्रक्रिया राबवावी. मतदार यादीतील तपशीलातील दुरुस्ती करुन ती कटाक्षाने अद्ययावत करावी, असे त्यांनी सांगितले.
मतदार यादीत नवमतदारांचा समावेश व्हावा, यासाठी यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे स्पष्ट करून श्री. राव म्हणाले, महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के मतदार नोंदणी करण्यावर भर देण्यात यावा. त्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. जिल्ह्याचे ब्रँड अँम्बॅसिडर, युथ आयकॉन यांच्यामार्फत नवमतदारांना लोकशाही बळकटीकरणामध्ये त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी. मतदार यादीमध्ये नावनोंदणीसाठी प्रवृत्त करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी सांगली जिल्ह्याचे सादरीकरण केले. यामध्ये प्राप्त अर्ज, कार्यवाही केलेले अर्ज, स्वीकृत व नाकारण्यात आलेले अर्ज, प्रलंबित अर्ज, कार्यवाहीमध्ये येणाऱ्या अडचणी, घर ते घर सर्वेक्षण, नवमतदार नोंदणीसाठी केलेले प्रयत्न यांची माहिती त्यांनी सादर केली.
00000