मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मुंबईतील धारावी आणि डी विभागात संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मुंबईतील धारावी आणि डी विभागात संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

संपूर्ण स्वच्छता मोहिमेची ‘प्रमाणित कार्यपद्धती’ तयार

यापुढे दर शनिवारी, प्रत्येक परिमंडळात एक विभाग याप्रमाणे, सात विभागांमध्ये व्यापक स्तरावर स्वच्छता होणार

मुंबई, दि. २ – स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. त्‍यासाठीची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) देखील तयार करण्‍यात आली आहे. या ‘डीप क्लिनिंग’ मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्‍या प्रमुख उपस्थितीत उद्या रविवार, दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ७:०० वाजता जी उत्‍तर विभागातील धारावीतून करण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी डी विभागातदेखील संपूर्ण स्वच्छता मोहीम सकाळी १०:०० राबवली जाणार आहे.

राज्‍याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण स्वच्छता मोहिमेत महानगरपालिकेचे सुमारे ५ हजार अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकदेखील सहभागी होणार आहेत.

या विशेष मोहिमेअंतर्गत निवडलेल्‍या विभागातील रस्ते – पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई,  सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्यान – क्रीडांगणांची निगा, कर्मचारी वसाहतींमध्ये स्वच्छता, फेरीवाला विरहित क्षेत्र, राडारोडामुक्त  परिसर, केबल्स व वायर्स यांचे जाळे हटवणे आदी कार्यवाही केली जाणार आहे. या स्वच्छ‍ता मोहिमेत लोकप्रतिनिधींसह, समाजातील ख्यातनाम व्यक्ती, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन तरूण, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था – संघटना आदींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या विशेष मोहीमेविषयीचा तपशील देताना उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्रीमती चंदा जाधव म्हणाल्या की, डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ या दोन महिन्‍यातील प्रत्‍येक शनिवारी राबविण्‍यात येणा-या ‘डीप क्लिनिंग’ मोहिमेसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) देखील तयार करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार, महानगरपालिकेच्‍या विविध विभागातील अधिकारी – कर्मचा-यांच्‍या जबाबदारीचे वाटप करण्‍यात आले आहे. त्‍यानुसार, प्रत्येक परिमंडळातील एक विभाग (वॉर्ड) निवडून व्‍यापक स्‍तरावर व सखोल, सर्वांगीण स्‍वच्‍छता केली जाणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू राहील. विभागाचे सहायक आयुक्त साप्ताहिक कार्यक्रमासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रांची नावे निश्चित करतील. शनिवारी सकाळी सामूहिक स्वच्छता मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी त्या भागातील सर्व रस्ते, गल्ल्या संबंधित कर्मचा-यांकडून नियमित कामकाजाप्रमाणे स्वच्छ करण्यात येतील. स्वच्छता मोहिमेदरम्यान वाहतूक विभाग, मलनिस्सारण विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग आदी आवश्यक अतिरिक्त वाहने आणि संयंत्रे पुरवतील. तर अतिक्रमण निर्मूलन विभाग विनापरवाना जाहिरात फलक, पोस्टर्सवर आदींवर कारवाई करेल. तसेच परिसरातील बेवारस वाहने हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत देखील घेण्‍यात येईल.

डीप क्लिनिंगमोहिमेसाठी प्रमाणित कार्यपद्धती

१) विभागाचे सहायक आयुक्त त्यांच्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रांची नावे निश्चित करतील.

२) कचरा अलगीकरणासह सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, सार्वजनिक उद्याने – स्थानिक उद्यानांची निगा राखणे, मुलांसाठी खेळण्याची साधने असणे व ती सुस्थितीत असणे, शासकीय कर्मचारी निवासस्थाने – वसाहतींमध्ये सामूहिक स्वच्छता राबविणे, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, अस्ताव्यस्त विखुरलेले केबल्सचे जंजाळ काढणे यांसह विविध उपाययोजना राबविल्या जातील.

३) गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिकदृष्ट्या सक्रिय नागरिकांना स्वच्छता मोहिमेबद्दल माहिती दिली जाईल.

४) सामूहिक स्वच्छता मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी त्या भागातील सर्व रस्ते, गल्ल्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून नियमित कामकाजाप्रमाणे स्वच्छ करण्यात येतील.

५) ज्या रस्त्यांवर धूळ साचली आहे, असे रस्‍ते फायरेक्स/डिस्लडिंग/वॉटर टँकर वापरून धुतले जातील.  त्‍यानंतर एकाच वेळी ब्रशिंग केले जाईल. या मोहिमेदरम्यान संकलित होणा-या गाळाची स्वतंत्रपणे विल्‍हेवाट लावली जाईल.

६) उद्यान विभागातील कर्मचारी विभागातील उद्याने आणि खेळाचे मैदान स्वच्छ करतील.

७) कीटकनाशक विभाग परिसरात फवारणी करेल आणि संसर्गजन्‍य रोगांना प्रतिबंध करण्‍यासाठी रासायनिक औषधांचा वापर करेल.

८) मोहिमेदरम्‍यान परिसरातील सार्वजनिक प्रसाधनगृहे पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक केली जातील.

९) रस्त्यांलगतच्या भिंती स्वच्छ करुन त्या सामाजिक संदेशाने रंगवल्या जातील. त्‍यासाठी कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्‍यात येईल.

१०) जास्तीत जास्त लोकसहभागासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, ख्यातनाम मान्यवर, अशासकीय संस्‍था, विद्यार्थी, सामाजिक सक्रिय नागरिक तसेच सामाजिक संघटना इत्यादींना सहभागी करून घेण्‍यात येणार आहे.

११) अनधिकृत जाहिरात फलकांवर अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत कारवाई करण्‍यात येईल. विभागातील बेवारस वाहने हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेण्‍यात येईल.

१२) कानाकोप-यात साचलेला कचरा, राडारोडा हटविला जाईल.

१३) स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी घनकचरा विभाग, वाहतूक विभाग, मलनिस्सारण विभाग, पर्जन्‍य जल वाहिनी विभाग हे आवश्यक अतिरिक्त वाहने आणि यंत्रणा पुरवतील.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here