आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी वसतिगृह बांधण्यावर भर देणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी वसतिगृह बांधण्यावर भर देणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नाशिक, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा): शहरी भागात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या  सोयीसुविधांसोबतच त्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आदिवासी शासकीय वसतिगृह बांधण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

नाशिक येथे आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह इमारत उद्घाटन कार्यक्रमात राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, आदिवासी विकास महामंडळाच्या संचालिका लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाच्या सहआयुक्त विनीता सोनवणे, आदिवासी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय पाटील, कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे, कार्यकारी अभियंता एस. एस. सांगळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, शहरी भागात भाड्याच्या व जुन्या वसतिगृहातील प्रत्येकी 250 अशा एकूण ५०० विद्यार्थिनींना या नवीन वसतिगृहात स्थलांतरित करण्यात येणार आहे. स्थलांतरामुळे रिक्त झालेल्या वसतिगृहात नवीन विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येणार आहे. जेणेकरुन शहरात येणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींची राहण्याची गैरसोय होणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जिल्ह्यासोबतच तालुका स्तरावर देखील निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय ही मेसच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यासोबतच आदिवासी प्रशासकीय संकुलास मान्यता देण्यात आली आहे. या संकुलामध्ये प्रशासकीय कार्यालय, जात प्रमाणपत्र पडताळणी, प्रकल्प कार्यालय असे विविध प्रशासकीय कार्यालयांचा समावेश असणार आहे. लिपिक, सुरक्षा रक्षक, वाहनचालक अशा विविध पदांच्या स्पर्धा परीक्षांच्या सरावासाठी ॲकॅडमी सुरु करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. असे यावेळी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे उद्घाटन करून सर्व उपस्थितांनी वसहतिगृहाची पाहणी करुन कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर आदिवासी क्रांतीकारकांच्या प्रतिमांचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.

असे आहे मुलींचे वसतिगृह

नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी मुलींचे वसतिगृह 4162.62 चौरस मीटर एकूण क्षेत्रफळात बांधण्यात आले असून यासाठी रुपये 12 कोटी 75 लाख 63 हजार 201 इतका निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

तळमजला : ॲक्टिविटी एरिया

पहिला मजला : अपंग रूम, अधीक्षक निवासस्थान, 1 ऑफिस, 5 रूम, मीटर रूम, 5 शौचालये व 5 बाथरूम

दुसरा ते सहावा मजला : प्रत्येकी 10 रूम, 10 शौचालये व 10 बाथरूम

सातवा मजला : 6 रूम, 4 शौचालये व 4 बाथरूम, 1 कॉम्प्युटर रूम, 1 अभ्यासिका आणि लायब्ररी असे एकूण 610 क्षमतेचे हे वसतिगृह आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here