अवकाळी पावसाने झालेल्या शेतपीक नुकसानीचा अंतिम अहवाल आठवडाभरात सादर करावा- मंत्री अनिल पाटील

अवकाळी पावसाने झालेल्या शेतपीक नुकसानीचा अंतिम अहवाल आठवडाभरात सादर करावा- मंत्री अनिल पाटील

नाशिक, दिनांक 28 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या शेतपीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अंतिम अहवाल आठवडाभरात शासनास सादर करावा. अशा सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ,  जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

मंत्री अनिल पाटील यावेळी म्हणाले, जिल्ह्यात अवकाळीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे वस्तूनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करून त्यांचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासानाने येत्या सात दिवसांच्या आत शासनाकडे पाठवावा. शासन नेहमीच शेतक-यांच्या पाठीशी असून शासन निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची कार्यवाही शासनाकडून जलदगतीने करता येणे शक्य होणार आहे. नुकसानीचे पंचनामे करतांना यात कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार याची दक्षता कटाक्षाने घेण्यात यावी. अंतिम अहवाल प्राप्तीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेशी सविस्तर चर्चा करून शासनस्तरावर शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात रविवारी 152 महसूल मंडळापैकी 66 मंडळात 25 मिमी. पेक्षा जास्त तर वेहेळगाव, ता. नांदगाव मंडळात 66 मिमी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे प्राथमिक नजर अंदाजानुसार द्राक्ष पीकांचे 11 हजार 652 हेक्टर, कांदा पीकाचे 10 हजार 673 हेक्टर, डाळींब व इतर पिकांचे मिळून 34 हजार  हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यात अंदाजे 924 गावे बाधित झाले असून 70 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. इगतपुरी तालुक्यात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले आहेत. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी बैठकीत दिली. तसेच नुकसानीची विमा भरपाईची मागणीचे अर्ज 72 तासात ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाड व बागलाण तालुक्यांत प्रत्येकी एक व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रूपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. अवकाळीमुळे जिल्ह्यात 15 मोठी जनावरे तर 50 लहान जनावरे दगावली आहेत. त्याचप्रमाणे 206 घरांचे अंशत: तर 31 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहेत. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी यावेळी दिली.

अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे पंचनामे प्रशासनामार्फत जिल्ह्यात सुरू आहे. परंतु यात कोणी बाधित शेतकरी राहीले असतील तर त्यांनी स्वत: संपर्कात येवून आपल्या नुकसानीचे पंचनामा करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी केले.

प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करताना वस्तुनिष्ठ व तातडीने करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी उपस्थित लोकप्रतिनिधींनी केली.

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here