मराठा समाजातील बांधवांनो टोकाचे पाऊल उचलू नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजातील बांधवांनो टोकाचे पाऊल उचलू नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.२२:  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या बंधुंनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक आवाहन करतानाच राज्य सरकार मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथे सांगितले.

ठाणे येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येच्या घटना ह्या दुर्देवी आणि दु:खदायक, वेदनादायी आहेत. माझी विनंती आहे की टोकाचे पाऊल उचलू नका. बंधूंनो आपला जीव लाख मोलाचा आहे. आपल्या कुटुंबाचा, आई वडिलांचा, मुला बाळांचा विचार करा, अशी भावनिक साद देतानाच राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली असून १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. ही दिलासादायक बाब असून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत आधार देणारी आहे. राज्य शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाबाबत वस्तुस्थितीदर्शक बाजू प्रभावीपणे मांडण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मराठवाड्यात जुन्या नोंदींच्या आधारे कुणबी दाखले देण्यासाठी  निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यवाही सुरू आहे. खोलवर जाऊन नोंदी तपासण्याचे काम समितीमार्फत सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आरक्षण मिळेपर्यंत जे लाभ आहेत ते मराठा समाजाला जास्तीत जास्त कसे मिळतील यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सागितले. मी देखील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याच्या पुनरूच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

नवरात्रोत्सवानिमित्त ठाण्यातील टेंभीनाका मित्र मंडळाच्या आई भवानी मातेचे मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब दर्शन घेत पूजा केली. यावेळी राज्यावरील, बळीराजावरील संकट दूर करून राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे असं साकडं घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here