महिलांसाठी जननी सुरक्षा व जननी‍ शिशु सुरक्षा योजना

महिलांसाठी जननी सुरक्षा व जननी‍ शिशु सुरक्षा योजना

            ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील  व अनुसूचित जाती जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये  होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण  वाढविणे व माता मृत्यू  व अर्भक मृत्यू प्रमाण कमी  करण्यासाठी  जननी सुरक्षा योजना  राबविण्यात येते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील सर्व गर्भवती महिला या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र आहेत. तसेच, बालकाला आवश्यक सेवा व उपचारात मदत करण्यासाठी जननी शिशु सुरक्षा योजना राबविली जात आहे.  या योजनांबाबत थोडक्यात…..

जननी सुरक्षा योजना

गरोदर मातांची लवकर नोंदणी, किमान तीन तपासण्या व सेवांचा लाभ, संस्थात्मक प्रसूती, जोखमीची वेळीच नोंद घेऊन संदर्भ सेवा, गरजेनुसार सिझेरियनसाठी अर्थसहाय्य, याद्वारे माता मृत्यू अर्भक मृत्युदर कमी करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.

            ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थीची प्रसूती घरी झाल्यास 500 रुपये, शहरी भागातील लाभार्थीची प्रसूती शासकीय किंवा शासनमान्य मानांकित आरोग्य संस्थेत झाल्यास 600 रुपये, ग्रामीण भागातील लाभार्थीची प्रसूती शासकीय किंवा शासनमान्य मानांकित आरोग्य संस्थेत झाल्यास 700 रूपये, तर सिझेरिअन शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थीस 1500 रुपये लाभ देय आहे.

प्रसूती सेवा उपलब्ध असलेल्या सर्व शासकीय आरोग्य संस्था व शासन मानांकित खासगी आरोग्य संस्थेत या सेवा उपलब्ध असून सेवा मिळण्यासाठी रहिवासी दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर प्रसुतीनंतर 7  दिवसांच्या आत या योजनेचा लाभ हा लाभार्थीच्या बँक खात्यावर डीबीटी, पीएफएमएसद्वारे, धनादेशाद्वारे देण्यात येतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या आशा, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

जननी शिशु सुरक्षा योजना

            या योजनेअंतर्गत गरोदर मातेस प्रसूती पश्चात 42  दिवसांपर्यंत मोफत सुविधा देण्यात येतात. प्रसूती, सिझेरीयन शस्त्रक्रिया, प्रसूती संदर्भातील गरोदरपणातील व प्रसूती पश्चात आवश्यक औषधे व साहित्य, प्रयोगशाळेतील तपासण्या, प्रसूती पश्चात आहार (स्वाभाविक प्रसूती 3 दिवस, सिझेरीयन प्रसूती – 7 दिवस), मोफत रक्तसंक्रमण, घरापासून आरोग्य संस्थेपर्यंत, एका आरोग्य संस्थेतून दुसऱ्या आरोग्य संस्थेत तसेच आरोग्य संस्थेतून घरापर्यंत वाहतूक व्यवस्था करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

तसेच, या योजनेंतर्गत एक वर्षापर्यंतच्या आजारी बालकास उपचारासाठी आवश्यक औषधे व साहित्य, प्रयोगशाळेतील तपासण्या, मोफत रक्तसंक्रमण, घरापासून आरोग्य संस्थेपर्यंत, एका आरोग्य संस्थेतून दुसऱ्या आरोग्य संस्थेत तसेच आरोग्य संस्थेतून घरापर्यंत वाहतूक व्यवस्था करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

            ही सेवा शासकीय आरोग्य संस्थेत उपलब्ध असून  आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर गरोदरपणाच्या काळात, प्रसूती दरम्यान, प्रसूतीनंतर 42 दिवसांपर्यंत व एक वर्षे वयापर्यंतच्या आजारी बालकास सेवा पुरविली जाते. मुलांच्या आरोग्याबाबत, संगोपनाबाबत व विनामूल्य उपचाराबाबत  आशा, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

00000

-संकलन- एकनाथ पोवार

माहिती अधिकारी, सांगली

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here