कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट

पुणे, दि. 17 : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभागांतर्गत शिवाजीनगर येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली व येथील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता सुनील मासाळकर, प्रकल्पाचे तांत्रिक प्रमुख प्रा. डॉ. धीरज कणखरे, संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. मुंडे यांनी उत्पादनांची पाहणी करून माहिती घेतली. त्यांनी दुग्धशास्त्र प्रयोगशाळा, विविध गायींच्या गोठ्यांना भेटी देऊन माहिती घेतली. गोबरगॅस, बायोगॅस प्रकल्प, मूरघास यंत्र आदींची पाहणी त्यांनी केली. देशी गायींच्या मोठ्या गोठे असणाऱ्यांनीही दूध उत्पादनाबरोबरच त्यावरील प्रक्रिया पदार्थ करण्यावर भर दिल्यास दूध व्यवसाय नफ्यात येऊ शकतो असे यावेळी सांगण्यात आले.

डॉ. माने यांनी केंद्राविषयी माहिती दिली. या ठिकाणी गायीच्या ११ देशी गोवंश जाती उपलब्ध आहेत. अधिक दुग्धोत्पादन करणाऱ्या देशी गाईंच्या वंशवृद्धीसाठी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा येथे वापर केला जातो. देशातील पहिले काऊ टुरिझम येथे सुरू करत आहोत. गोठ्यात सेन्सर बसवले आहेत. त्यामुळे गोठ्यातील तापमान, गाईंमधील ताण याची माहिती साठी ॲप तयार केले असून गायींसाठी खाद्य, पाणी इत्यादी मार्गदर्शन देता येईल.

येथे उत्पादन होणारे दूध विद्यार्थ्यांकडून प्रयोगासाठी तसेच प्रशिक्षणांतर्गत विविध दुग्ध उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जातात. तसेच शेणावर, गोमूत्रावर प्रक्रिया करुन जीवामृत, ट्रायकोडर्माने समृद्ध खते बनविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी दुधापासून प्रक्रिया पदार्थ करण्याचे 1 दिवस ते 10 दिवसांचे विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविले जातात, असे यावेळी सांगण्यात आले. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी सॉफ्टी आइस्क्रीम बनविण्याचे प्रात्यक्षिकही दाखविले.

0000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here