सातारा दि. ७ ( जि.मा.का.) – शिक्षक म्हणजे शैक्षणिक प्रगतीमध्ये मोलाचे योगदान असणारा सामाजिक घटक आहे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळ्याचे स्थान निर्माण करावे असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीनिवास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, आय केअर कंपनीचे सी.इ.ओ. संतोष भोसले आदी उपस्थित होते.
शिक्षक हे भविष्यातील पिढी घडवण्याचे काम करतात असे सांगून पालकमंत्री म्हणाले, पूर्वी दळण वळणाच्या सुविधा नसतानाही शिक्षकांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, तेंव्हाच शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई असे विद्यार्थी घडवले, आता सोयी झल्या आहेत. आताच्या शिक्षकांनी ही चांगले विद्यार्थी घडवावेत. छान काम करून चांगली नवी पिढी घडवावी ही अपेक्षा आहे. आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहेत. त्यासाठीच्या सोयी सुविधा उभारण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आय केअरचे सी.ई.ओ. यांनी सीएसआर निधीतून ५०० संगणक दिलेत. त्यातील १०० संगणकाचे आज वाटप होत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. जिल्ह्यातील मोठ्या उद्योजकांनी त्यांच्या सीएसआर निधीतून शाळांसाठी भरीव मदत करावी. शिक्षकांवरील ताण कमी करण्यासाठी लवकरच शिक्षक भरती करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री देसाई यांनी सांगितले.
यावेळी खासदार श्री पाटील यांनी पूर्वीची व आताची परिस्थिती मधील फरक सांगितला. तसेच शिक्षण क्षेत्रातील सातारा जिल्ह्याची परंपराही विषद केली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खिलारी यांनी शिक्षण विभागाच्या कामकाजाची माहिती दिली.
कार्यक्रमास शिक्षक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.