समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रादेशिक परिषदेचे नाशिकला ६ व ७ ऑक्टोबर रोजी आयोजन

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रादेशिक परिषदेचे नाशिकला ६ व ७ ऑक्टोबर रोजी आयोजन

मुंबई, दि. 5 : ग्रामीणस्तरावर गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी देशात सुमारे दीड लाखांहून अधिक समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांच्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या निर्देशानुसार पश्चिम विभागातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची (सीएचओ) दुसरी प्रादेशिक परिषद ६ आणि ७ ऑक्टोबर २०२३ असे दोन दिवस नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल तसेच राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेला सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, दादरा-नगर हवेली, आणि दमण-दीव या सहभागी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे २०० समुदाय आरोग्य अधिकारी या परिषदेत सहभागी होणार आहेत. आतापर्यंत देशात एकूण १ लाख ६१ हजारांपेक्षा अधिक आरोग्य सेवा केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. प्रत्येक उपकेंद्रातील प्राथमिक आरोग्य पथकात एक महत्त्वाची भर म्हणून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. देशात सुमारे १ लाख ३० हजारांहून अधिक समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.

या परिषदेला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अधिकारी, आयुष मंत्रालयाचे अधिकारी, राज्य अधिकारी, राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ, आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राला मदत करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक, आयुष संचालक आदी उपस्थित राहणार आहेत.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here