शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देवून उत्तम खेळाडू निर्माण करावे – अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देवून उत्तम खेळाडू निर्माण करावे – अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दिनांक: 24 सप्टेबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी शाळांमध्ये विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन दिले तर उत्तम खेळाडू निर्माण होतील. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज येवला शहरातील भाऊलाल पहिलवान लोणारी क्रीडा संकुल येथे आयोजित विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा उद्घाटन प्रसंगी मंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, तहसिलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, यांच्यासह क्रिडा शिक्षक, प्रशिक्षक, स्पर्धक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेचा प्रथम मान येवला शहरास मिळाला ही बाब भूषणावह आहे. आज येथे होत असलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हा तसेच नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे महानगरपालिका क्षेत्रातील विविध वयोगातील २४० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहे. फ्री स्टाईल व ग्रिकोरोमन या दोन प्रकारात कुस्ती स्पर्धा येथे होणार असून यात १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या स्पर्धेत विजयी होणा-या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड केली जाणार आहे.

मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले की, येवला शहराला सुमारे शंभर ते दीडशे वर्षाहून अधिक काळापासून कुस्तीची परंपरा आहे. ‘घर तेथे पहिलवान’ अशी येवला शहराची ख्याती असून येवला शहर आणि तालुक्याने कुस्ती स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. येवला शहरात फार जुने तालीम संघ आहे. त्यातून आजवर अनेक कुस्ती खेळाडू घडले आहे. येवल्यातील लोणारी कुटुंबाने तर सुमारे ५ पिढ्यापासून कुस्ती खेळाची परंपरा जोपासली आहे. येवला तालुक्यातील विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी तालुका क्रीडा संकुलाची निर्मिती केली आहे. जलतरणासह विविध खेळांच्या सरावासाठी या क्रीडा संकुलात सेवा-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये महिला व पुरूषांसाठी स्वंतंत्र व्यायामशाळा निर्माण करण्यात आलेल्या आहे. यापुढील काळातही खेळाला आधिक प्राधान्य देऊन त्यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये येवल्यातील खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी केली आहे. या पुढेही अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून चांगले खेळाडू पुढे येतील अशा विश्वास व्यक्त करीत मंत्री श्री. भुजबळ यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here