गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी व्हावे – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी व्हावे – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

मुंबई, दि. ११ : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत मुंबई शहर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपकेर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

पर्यावरणपूरक सण साजरे व्हावेत, उत्सव साजरे करताना सामाजिक बांधिलकी जपावी, आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे याकरीता राज्य शासनाने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपये, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी १० ते २८ सप्टेंबर २०२३ पर्यंतचा कालावधी विचारात घेतला जाणार आहे. राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै व ३० ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या ई- मेलवर १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here