भाजप शहराध्यक्षांचा माफीनामा
नरेंद्र काळे स्वतः शेखर बंगाळेला महसूलमंत्री विखे पाटील यांच्याकडे निवेदन देण्यासाठी घेऊन गेले होते. धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वय शेखर बंगाळे यांनी खिशातून काय काढले, हे मला समजले नाही. त्या झटापटीत माझ्याकडून अनावधनाने काही गोष्टी झाल्या. त्याबद्दल धनगर समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी समस्त धनगर समाजाची माफी मागतो. धनगर समाजातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी या गोष्टीचं भांडवल करू नये. झालेल्या चुकीबद्दल मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी माफी मागितली. धनगर समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी समस्त धनगर समाजाची माफी मागतो. मी जसा भारतीय जनता पक्षाचा सोलापूर शहराध्यक्ष आहे, तसाच सर्वात आधी धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे. समाजाच्या चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे, असेही काळे यांनी स्पष्ट केले.
स्वतःच्या जबाबदारीवर पालकमंत्र्यांकडे शेखरला घेऊन गेलो
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आले होते. शेखर बंगाळे हा शुक्रवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात विखे पाटलांना निवेदन देण्यासाठी आला होता. सुरक्षा रक्षक शेखरला आतमध्ये सोडत नव्हते. नरेंद्र काळे यांनी स्वतः सुरक्षा रक्षकांना सांगितले, शेखरला सोडा. भाजप शहर अध्यक्षांनी स्वतःच्या जबाबदारी निवेदन देण्यासाठी विखे पाटलांजवळ आणलं होतं. शेखरने निवेदन दिल्यानंतर अचानक खिशातून भंडारा काढला आणि विखे पाटलांच्या अंगावर फेकला.