बारसूच्या सड्यावर यापूर्वी एका दुर्मिळ कातळशिल्पाचा शोध घेण्यात आला होता. आता पुन्हा त्याच भागात दुर्मिळ फूलवनस्पती आढळल्याने राजापूरकरांचे कुतुहल जागरूक झाले आहे. उन्हाळ्यामध्ये कोरडे शुष्क अन् रखरखीत असलेला हा कातळ परिसर पावसाळ्यामध्ये मात्र, हिरवागार आणि फुलोत्सवाने बहरलेला दिसतो. जैवविवधततेने नटलेला कातळ परिसरामध्ये जागतिकस्तरीय फुलवनस्पती फुलत असल्याचे गेल्या काही वर्षामध्ये संशोधनाद्वारे स्पष्ट झाले आहे.
आठ वर्षांनी फुलते कारवी फुलवनस्पती
तब्बल आठ वर्षांनी एकदा फुलणाऱ्या “कारवी” या फुल वनस्पतीची भर पडली आहे. प्रत्येक वर्षी फक्त पावसाळ्यात या वनस्पतीची वाढ होते आणि पावसाळा संपला की फांद्या सुकून जातात. पण आठव्या वर्षी झाडाला फुलांचा बहर येतो. यातून बाहेर पडणाऱ्या बिया पुनरुत्पादनचे काम पुढे चालू ठेवतात आणि जुनी झाडे जीवनकार्य संपवतात. जांभळ्या रंगाची टपोरी फुले असलेल्या कारवीच्या झाडांचा एकाचवेळी होणारा बहर, फुलोत्सव सृष्टीचा एक अलौकिक रंगसोहळा असतो.
कारवी झाडाची सुमारे १.८-६.२० मी. उंची असून सहयाद्री घाटात आणि मध्य भारतात ती मोठ्या प्रमाणात आढळतात. या झाडाचे खोड दृढ,खडबडीत व बारीक दांड्यासारखे असून पाने १० २३ बाय ४८ सेंमी, संमुख असतात. याला सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यामध्ये फुलोरा येतो. प्रवासादरम्यान वैशिष्ट्यपूर्ण फुलवनस्पती नजरेस पडली. बघताक्षणी त्याबद्दल कुतूहूल निर्माण झाले. त्यातून, दुर्मिळ आणि नाविन्यपूर्ण असलेल्या कारवी या फुलवनस्पतीची माहिती मिळाल्याचे सिनकर यांनी सांगितले.