म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहर पोलिस दलातील पोलिस शिपाई महिलेला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलिस शिपायाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेला पिस्तूलाचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने, लॅपटॉप असा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दीपक सीताराम मोघे (रा. स्वारगेट पोलिस वसाहत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिला आणि मोघे यांची ओळख आहे. करोना काळात मोघे महिलेच्या घरी जेवायला यायचा. त्यावेळी मोघेने महिलेला शीतपेयातून गुंगीचे ओैषध दिले. तिच्यावर बलात्कार करून ध्वनिचित्रफीत तयार केली.
ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली. महिलेवर अनेकदा शारीरिक अत्याचार केले. तिला धमकावून पतीसोबत घटस्फोट घेण्यास भाग पाडले. पिस्तूलाचा धाक दाखवून घरातील पाच ते सहा तोळे दागिने, मोबाइल, लॅपटॉप असा मुद्देमाल चोरला. या त्रासाला कंटाळून महिलेने नुकतीच खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अनैसर्गिक कृत्य, बलात्कार, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोघे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणयात आला आहे.