नांदेड आगारातून हिंगोली, सोलापूर, लातूर, औरंगाबाद, यवतमाळ, नागपूर, बिदर, जालना, संभाजीनगर,अकोला, बीड आदी मार्गावरील लांब पल्याच्या रद्द करण्यात आल्या. तसेच ग्रामीण भागातही बस सोडण्यात आली नाही. नांदेड आगारातून शेकडोच्या संख्येने प्रवासी बसमधून प्रवास करत असतात. मात्र अचानक घेतलेल्या बंदच्या निर्णयामुळे बस स्थानकात आलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली. तासंतास प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. नांदेड आगारातून दररोज ११६ बसेस धावत असतात. त्यातून नांदेड आगाराला दररोज ११ लाखाचे उत्पन्न होते. पण आज लांब पल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्याने नांदेड आगाराला पाच ते सहा लाखाचे नुकसान झाले आहे. पोलिसांच्या पुढील सूचनेनंतर लांब पल्याच्या बसेस पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती नांदेड आगार प्रमुख यासिन खान यांनी दिली आहे.
सोमवारी नांदेड बंदची हाक
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजा तर्फे सोमवारी नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे. आंदोलकांना लाठीचार्ज करणाऱ्या जालना येथील पोलीस अधीक्षकाला निलंबित करण्याची मागणी सकल मराठा समाजा तर्फे करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी नांदेड शहरासह जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलकाकडून टायर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. माहूर तालुक्यात टायर जाळून घटनेचा निषेध करण्यात आला. माहूर बंद देखील ठेवण्यात आले होते.