पावसाळ्याच्या चार महिन्यांत जून ते सप्टेंबरपर्यंत अरबी समुद्र खवळलेला असतो. या कालावधीत समुद्राला मोठी भरती असल्यास लाटांची उंची वाढते. यंदा जूनमध्ये पाच दिवस, जुलैमध्ये सहा तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक आठ दिवस मोठी भरती होती. यामध्ये १ ते ६ ऑगस्ट व ३०, ३१ ऑगस्टचा समावेश आहे. सप्टेंबरमध्ये सहा दिवस मोठी भरती आहे. मध्यरात्रीही भरती येणार असल्यामुळे सहा दिवसांत किमान १० वेळा भरती येणार आहे. यावेळी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. भरतीच्या दिवशी साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या मोठ्या लाटा उसळल्यास धोकादायक समजले जाते.
भरतीमुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, चौपाटीवर गेल्यानंतर किनाऱ्यापासून दूर राहावे, समुद्राच्या पाण्यात उतरू नये, अशा विविध सूचना पालिकेतर्फे करण्यात आल्या आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. गिरगाव, दादर, माहीम, खार, जुहू, सात बंगला, वर्सोवा, मार्वे, मढ व अन्य समुद्रकिनारी तैनात असलेल्या जीवरक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. भरतीच्या वेळेत पोलिस तैनात असणार आहेत. २ आणि ३ सप्टेंबरला शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे.
तारीख-वेळ-लाटांची उंची
३० ऑगस्ट-११.२६ वा.-४.५९ मिमी
३१ ऑगस्ट-१२.०६ वा.-४.८० मिमी
१ सप्टेंबर-१२.४४ वा.-४.८८ मिमी
२ सप्टेंबर-१.२२ वा.-४.८४ मिमी
३ सप्टेंबर-१.५२ वा.-४.६६ मिमी
दरम्यान, अरबी समुद्राला पुढील पाच दिवस भरती येणार असून या काळात मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक होणार का हे देखील पाहावं लागेल. मुंबईत ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण घटलं आहे.