दर वर्षी २५ ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान ‘राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा’ आयोजित केला जातो. या निमित्त आरोग्य विभाग आणि नेत्रदानासाठी कार्यरत संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. करोना संसर्गामुळे राज्यात वर्ष २०२०-२१ मध्ये रुग्णांची तपासणी करून संसर्गाची खातरजमा करूनच नेत्रदान करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या होत्या. त्याचा फटका नेत्रदानाला बसला.
पुणे जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये १३०० नेत्रसंकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, करोनामुळे ४७६ नेत्रसंकलन झाले होते. पैकी २९९ बुबुळांचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. जिल्ह्यात २०१७ पासून आतापर्यंत सर्वांत कमी संकलन आणि प्रत्यारोपण २०२०-२१मध्ये झाले. करोनाकाळात जिल्ह्यातील काही नेत्रपेढ्याही बंद होत्या. मात्र, २०२१नंतर करोनारुग्णांची संख्या कमी झाल्याने पुन्हा नेत्रसंकलनात वाढ होत आहे. जिल्ह्यात यंदा जुलैपर्यंत ४०० नेत्रसंकलन झाले असून, पैकी २५२ बुबुळांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.
जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अंजली कुलकर्णी यांनी सांगितले की, ‘सद्यस्थितीत जिल्ह्यातील नोंदणीनुसार बुबुळांच्या प्रत्यारोपणासाठी १९ जण प्रतीक्षेत आहेत. बुबुळांचे संकलन झाले की लगेच प्रत्यारोपण केले जाते. त्यामुळे प्रतीक्षा यादी कमी आहे.’ पुणे नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. मंदार परांजपे म्हणाले, ‘सध्या उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बुबुळांच्या विविध शस्त्रक्रिया करता येतात. संकलित बुबुळांचा उपयोग दृष्टी देण्याबरोबरच अभ्यासासाठीही करण्यात येतो. नेत्रदानामध्ये पूर्ण डोळा काढण्यात येत नाही. केव बुबुळ म्हणजे कॉर्निया (डोळ्याचा बाहेरील पारदर्शक पडदा) काढण्यात येतो.’
नेत्रसंकलन एका दृष्टिक्षेपात
वर्ष – उद्दिष्ट साध्य प्रत्यारोपण
२०१७-१८ १९०० १३९१ ६३३
२०१८-१९ १३०० १४२३ ६०६
२०१९-२० १३०० १४८३ ७७८
२०२०-२१ १३०० ४७५ २९९
२०२१-२२ १३०० ९३६ ६६९
२०२२-२३ १३०० ८९७ ६३८
२०२३-२४* १०४० ४०० २५२
(*जुलैपर्यंत)
संकलन जास्त; प्रत्यारोपण कमी
नेत्रसंकलनाच्या तुलनेत प्रत्यारोपणाचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, संकलन केलेल्या बुबुळांचा उपयोग दृष्टिदोष दूर करण्याबरोबरच संशोधनासाठीही केला जातो. संकलित केलेली सगळीच बुबुळे चांगली असतात असे नाही. त्यामुळे संकलनाच्या तुलनेत प्रत्यारोपणाचे प्रमाण कमी असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.