तलाठी परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या गणेश गुसिंगे वैद्यकीय शिक्षण भरती परीक्षेत उत्तीर्ण,परीक्षा आयोजनावर प्रश्नचिन्ह

तलाठी परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या गणेश गुसिंगे वैद्यकीय शिक्षण भरती परीक्षेत उत्तीर्ण,परीक्षा आयोजनावर प्रश्नचिन्ह

नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील दिंडोरी रोडवरील वेबईझी इन्फोटेक याठिकाणी तलाठी भरतीसाठी ऑनलाइन घेण्यात आलेल्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने परीक्षा केंद्राबाहेरून संशयित गणेश श्यामसिंग गुसिंगे यास ताब्यात घेतले होते. अशातच आता तलाठी भरती परीक्षेतील पेपर फुटीचा मुख्य संशयित आरोपी असलेला गणेश गुसिंगे हा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत पास झाल्याची माहिती समोर आलीय.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने काल DMER परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, ई.सी.जी. तंत्रज्ञ, आहारतज्ञ ,औषधनिर्माता अशा विविध ५१८२ पदांसाठी ही भरती परीक्षा होती. या परीक्षेत याआधी म्हाडा, पिंपरी चिंचवड पोलीस भरती आणि तलाठी भरती परीक्षेत आरोपी असलेल्या गणेश गुसिंगेला २०० पैकी १३८ गुण मिळाले. त्यामुळे या परीक्षेतसुद्धा या उमेदवाराने गैरप्रकार केला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या उमेदवाराकडून DMER परीक्षेत सुद्धा गैरप्रकार करण्यात आल्याचं स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला संशय आहे. टीसीएस, डीएमईआर आणि राज्य सरकारने अशा संशयित उमेदवारांची पूर्ण चौकशी करून निवड करावी अशी विनंती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे.

दरम्यान, ही परीक्षा देखील शंभर टक्के घोटाळ्यामध्ये झाली असल्याचा आरोप आज नाशिक दौऱ्यावर असलेले विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केलाय. ही परीक्षा रद्द करून, पुन्हा घ्यावी अशी मागणी त्यांनी केलीय. जे मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करतात, त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या या घटना असल्याचे त्यांनी म्हटलंय. एक हजार रुपये प्रति विद्यार्थ्यांच्या मागे गोळा करूनही, त्या एक हजार रुपयांत जर फेअर आणि ट्रान्सपरंट परीक्षा घेऊ शकत नसाल, तर आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, असा टोला तांबे यांनी सरकारला लगावला.

कोण आहे गणेश गुसिंगे

गुसिंगे याला DMER या परीक्षेत १३८ गुण मिळाले आहे.तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी नाशकात अटक करण्यात आलेला आरोपी गणेश गुसिंगे हा म्हाडा आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यात फरार होता. त्याच्याविरोधात म्हाडा परीक्षा भरतीमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी खेरवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. तर पिंपरी चिंचवड पोलीस भरती २०१९ मध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर याच गुसिंगेवर २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गणेश गुसिंगे हा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. संगीता गुसिंगे ही गणेशची बहीण असून ती नाशिक येथील परीक्षा केंद्रात पेपर देत होती.त्यावेळी गणेश हा त्याच्या बहिणीला हायटेक पद्धतीने परीक्षेत मदत करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्याकडून एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन आणि हेडफोन असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेचे फोटोही मिळून येताच म्हसरूळ पोलीस ठाण्यात गणेश गुसिंगेसह, सचिन नायमाने आणि संगीता गुसिंगे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here