शरद पवार आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट संचलित सवाई मंगल कार्यालय लोकापर्ण सोहळा पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, माजी मंत्री शशिकांत शिंदे हे उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज माफ केले पाहिजे. केंद्र सरकार साखरे बाबत वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत दिसत आहे. त्यामुळे उसाला योग्य भाव देता येणार नाही. सरकारचं हे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे नाही त्यासाठी एकसंध राहुन अनुकूल धोरण राबवणे गरजेचे आहे. सध्या कांद्याचा प्रश्न निर्माण झाला. राज्यातील सत्ता ज्यांच्या हातात आहे. त्यांना या बद्दल किती आस्था आहे हे न बोलले बरं, असा टोला शरद पवार यांनी लगावला.शेतीतील पिंकाना रास्त किमंत द्या यासाठी शेतकरी रस्तावर बसत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, त्यांच्या मालाला दर देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचेही पवार म्हणाले..
मुख्यमंत्री असताना पंढरपूर, जेजुरी, कोल्हापूर, तुळजापूर, बुलढाणा, शेवगावसह अनेक मंदिराचा चेहरा बदलण्याची खबरदारी घेत दरवर्षी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद केल्याने या सुसज्ज मंदिरांमध्ये विविध सोयी उपलब्ध झाल्या. असेही पवारांनी सांगितले.
वीर धरणातील पाण्यामुळे पुरंदर,इंदापूर, बारामती भागातील अनेक शेती क्षेत्र बागायती झाली हे वीर धरणाचे उपकार शेतकरी कधी विसरणार नाही. पाऊस नाही धरणात पाणी नाही यासाठी सरकारने पाउले उचलणे महत्त्वाचे आहे. आपल्या काळात पाणी चारा नसल्याने छावण्या काढल्या पिण्याच्या पाण्यासाठी टैंकरने पाणी दिले. बागायती भागात झांडाना पाणी देण्यासाठी निधी दिला,असेही पवारांनी यावेळी सांगितले..