उद्धव ठाकरे काय म्हणाले?
भाजपसोबत मी पॅचअप करु शकलो असतो, पण ते माझ्या नीतीमत्तेत बसत नव्हतं. २०१४ पासून ज्यांनी आपल्याला फसवलं त्यांच्यासोबत कसं जाणार? हा प्रश्न आहे. मी त्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, त्यामुळे मी माझ्या समर्थक आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो. पण जे मनाने फुटले होते, त्यांना डांबून ठेवून काय करणार होतो? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
त्यांच्यासाठी मी काय कमी केलं होतं? जुने निष्ठावंतच जेव्हा पक्ष सोडून जातात, तेव्हा वाईट वाटतं. तुमच्या पैकी कुणाला जायचं असेल तर तुम्हीही खुशाल जाऊ शकता, असंही उद्धव म्हणाले.
यापूर्वी देखील युती संदर्भात अशा प्रकारची विधानं ठाकरे कुटुंबीयांकडून करण्यात आली आहेत. याच कारणास्तव शिवसेना-मनसे युती होऊ शकलेली नाही. मी मनसेशी युती केली, तर ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी रक्त सांडलं आहे, ते काय विचार करतील, असं ठाकरे एका खाजगी बैठकीत म्हणाले होते. कार्यकर्त्यांना नाराज करायचे नसल्याने ठाकरेंनी अशा युती करणं टाळल्याचं दिसतं.
भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवबंधनात
दुसरीकडे, शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीची समीकरणे बदलणार असून लोकसभा निवडणुकीत वाकचौरे हे ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात.
श्री साई शिर्डी संस्थानमध्ये अधिकारी म्हणून काम केलेल्या वाकचौरे यांनी २००९ मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढवली होती. २००९ मध्ये निवडून आलेल्या वाकचौरे यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी मिळूनही काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. २०१४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढवली, मात्र मोदी लाटेत वाकचौरे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे वाकचौरे हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. सध्या शिर्डीचे प्रतिनिधित्व सदाशिव लोखंडे करत आहेत. लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेही शिर्डीतून लोकसभा लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे शिर्डीतील संभाव्य लढतीची उत्सुकता वाढली आहे.