कोल्हापुरातील श्री क्षेत्र रत्नागिरी ज्योतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिरातील चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा आज पार पडत आहे. यामुळे लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले असून दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. दरवर्षी यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यासह विविध राज्यातील तब्बल तीन ते चार लाख भाविक येत असतात. यामुळे येथे प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे. सोबतच वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आला असून यात्रेसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग कार्यरत आहे. पाणी निर्जंतुकीकरण, अत्यावश्यक सेवा आणि उपचार याची तयारी केली आहे. भाविकांसाठी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले असणार आहे. तर उद्या बुधवारी सकाळी श्रावण षष्ठीचा मुख्य आरती सोहळा होणार आहे.
देवस्थान समितीकडून सुरक्षेच्या कारणास्तव ठिकठिकाणी सीसीटीव्ही ही बसवण्यात आले आहेत. आदिमाया चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रेचे वैशिष्टय हे की, श्रावणषष्ठी दिवशी देवीने रत्नासुराचा वध केला म्हणून श्रावण षष्ठीला जोतिबा डोंगरावर चोपडाई देवीची यात्रा भरते. त्या युद्धानंतर देवीला प्रचंड दाह झाला. तो दाह शांत करण्यासाठी देवीला लिंबू, दुर्वा आणि बेलपत्र अर्पण करण्यात आले. म्हणून या यात्रेनिमित्त देवीची पूजा, दाहकता शांत करणाऱ्या लिंबू, दुर्वा आणि बेल अशा वनस्पतीमध्ये बांधण्यात येत असते. ही यात्रा रात्रभर असते. उद्या चोपडाई देवीची लिंबू, बेलपत्र, पाना-फुलांची वैशिष्ट्येपूर्ण अशी महापूजा करण्यात येईल. ती वर्षातून एकदाच बांधली जाते. रात्रभर मंदिरात चोपडाई देवीचा जागर सोहळा होत असतो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी धुपारती सोहळ्याने यात्रेची सांगता होत असते.