पोलिसांच्या तंदुरुस्तीसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर उपयुक्त – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

पोलिसांच्या तंदुरुस्तीसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर उपयुक्त – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगलीदि. 20, (जि. मा. का.) : प्रशिक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष कर्तव्य बजावताना पोलिसांनी तंदुरुस्त असायला हवे. त्यासाठी वैद्यकीय शिबीर उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले.

पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची व इंडियन मेडिकल असोसिएशन, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. तुरची  येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशन, मिरजचे सचिव डॉ. जीवन माळी, डॉ. भास्कर प्राणी, प्राचार्य धीरज पाटील, उप प्राचार्य सर्वश्री उदय डुबल आणि सूरज घाटगे, राखीव पोलीस निरीक्षक आनंदा वरेकर आदिसह असोसिएशनचे पदाधिकारी, केंद्राचे प्रशिक्षक, आंतरवर्ग व बाह्य वर्ग अधिकारी, अंमलदार, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, पोलिसांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जनतेची सेवा करायची आहे, हे लक्षात ठेवावे. महाराष्ट्र पोलीस विभाग देशात सर्वोत्तम आहे. हा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस अधिकारी,  कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत. स्वतःची कार्यक्षमता वाढवावी. त्यासाठी पोलिसांनी प्रकृती उत्तम ठेवावी. 24 तास जनतेच्या सुरक्षेसाठी योगदान देताना पोलिसांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. या वैद्यकीय तपासणी शिबिराच्या माध्यमातून पोलिसांच्या आरोग्याची जपणूक होण्यास मदत होईल. शिबिरात डॉक्टरांनी सुचविलेले पूर्ण उपचार संबंधितांनी करून घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.

पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणीमध्ये योगदान दिल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे स्मरण करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी प्रशिक्षण केंद्राच्या सुंदर वास्तुबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच आवश्यक आर्थिक निधीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. आमदार सुमन पाटील यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात धीरज पाटील यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्राची व विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली. आभार उदय डुबल यांनी मानले. सूत्रसंचालन राखीव पोलीस निरीक्षक राजू शिंदे यांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या शिबिरात जवळपास सातशेहुन अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षण केंद्राचा स्टाफ व त्यांचे कुटुंबीय तसेच प्रशिक्षणार्थिंची विविध वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात आले.

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here