त्यातून तिची मानसिक नैराश्याची टोकाची स्थिती लक्षात यावी आणि ती कोणत्यातरी दबावाखाली होती त्यामुळेच तिने अशा स्वरूपाचे सर्चिंग केले असावे हा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. त्यामुळे नीलिमा चव्हाण हिचा झालेला मृत्यू हा तिच्या मानसिक नैराश्यातूनच टोकाचं पाऊल उचलले असल्याने झाला अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी आत्महत्या करण्यास चिथावणी दिल्याचा गुन्हा स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यावर दाखल झाला आहे.
स्टेट बँकेच्या दापोली शाखेत काम करत असताना तिच्यावर असलेला कामाचा मोठा दबाव यामधूनच आपल्या नोकरीवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते, या टेन्शनमध्ये ती असावी अशा प्राथमिक निष्कर्षाप्रत पोलीस तपास आला आहे. दापोली शहरात अन्य स्पर्धक बँकांच्याही शाखा व अन्य पर्याय ऊपलब्ध असताना दररोज चार ते पाच डिमॅट अकाऊंट नव्याने ओपन होणे हे तसे सोपे नाही.
स्टेट बँकेचा अधिकारी गायकवाड याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. नीलिमा चव्हाण मृत्युप्रकरणात संशयित आरोपी असलेल्या संग्राम गायकवाड याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी दिली आहे. आज शनिवारी पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात गायकवाड याच्याबरोबर आणखी कोणी या प्रकरणात अटक होण्याची शक्यता तूर्तास तपासातील मिळालेल्या माहितीवरून वाटत नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र, आता पोलीस कोठडीत असलेल्या गायकवाड याच्याकडून कोणती माहिती पोलीस तपासात समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नीलिमा चव्हाण हिचा मृतदेह दाभोळ खाडीत मिळाल्यावर तिच्या डोक्यावर व भुवयांवर केस नसल्याने या मृत्यूप्रकरणी गूढ निर्माण झाले होते. विविध सामाजिक संघटना व नाभिक समाज बांधवांकडूनही संताप व्यक्त करण्यात आला होता. रत्नागिरी पोलिसांच्या तपासावरच आक्षेप घेत सगळे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणीही करण्यात आली होती. नीलिमा हिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर रत्नागिरी पोलिसांनी सगळ्या बाजूनेच तपास सुरू केला होता.
दरम्यान, या प्रकरणात नीलिमा काम करत असलेल्या स्टेट बँकेतील अधिकारीच दबाव टाकत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले अशी तक्रार तिच्या वडिलांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.