सरकारने दिलेल्या आदेशामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली असा आरोप युवा सेनेने (ठाकरे गट) केला आहे. जवळपास १२ लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल आपल्याविरोधात जाणार आणि जनतेमध्ये सरकारच्या प्रतिमेचा बट्ट्याबोळ उडण्याच्या भीतीने ही निवडणूक स्थगित केली आहे, असा आरोप युवा सेना नेते आणि माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केला.
या निवडणुकीसाठी सर्वच विद्यार्थी संघटनांनी जोरदार मोर्चे बांधणी केली होती. यंदा विक्रमी अशा ९४ हजार मतदारांची नोंदणी पदवीधर गटातील सिनेट निवडणुकीसाठी झाली होती. या निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र त्यापूर्वीच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या विशेष सभेत निर्णय घेऊन ही निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा विद्यार्थी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची मुदत गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात संपुष्टात आली होती. त्यानंतर नोव्हेंबरपर्यंत नवी सिनेट अस्तित्वात येणे अपेक्षित होते. मात्र विद्यापीठाचा कारभार प्रभारींवर सुरू असल्याने निर्णयप्रक्रीया जलदगतीने झाली नाही. त्यातून आधीच निवडणूकीला विलंब झाला आहे. त्यात आता सर्व अडथळे पार पडून सिनेट निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ती अचानक पुढे ढकलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
छात्रभारतीचे टीकास्त्र
सरकारमध्ये सामील झालेल्या पक्षांच्या युवा आघाडी आणि विद्यार्थी संघटनांची तयारी नसल्यामुळे, त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये पराभव होणार आहे हे लक्षात आल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने हा रडीचा डाव खेळला आहे, असं छात्रभारतीचे रोहित ढाले म्हणाले. छात्रभारती विद्यार्थी संघटना याचा तीव्र निषेध करते. निवडणुकीत जिंकता येणार नाही हे लक्षात येते त्यावेळेस निवडणूक स्थगित करणे किंवा निवडणुकीचा कालावधी पुढे ढकलणे, अशा प्रकारचा एक चुकीचा पायंडा हे सरकार पाडत आहे. त्याचा छात्रभारतीकडून धिक्कार करतो, अशी टीका छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे राज्यअध्यक्ष रोहित ढाले यांनी केली.